“अवयवदान हे श्रेष्ठ दान” — ग्रामपंचायत खडक सुकेणे येथे प्रेरणादायी उपक्रमाचा शुभारंभ

Jan 26, 2026 - 20:03
Jan 26, 2026 - 20:12
 0
“अवयवदान हे श्रेष्ठ दान” — ग्रामपंचायत खडक सुकेणे येथे प्रेरणादायी उपक्रमाचा शुभारंभ

खडक सुकेणे | प्रतिनिधी

आज दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिन व गणराज्य दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत खडक सुकेणे यांच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत “अवयवदान हे श्रेष्ठ दान” या संकल्पनेचा भव्य शुभारंभ करण्यात आला.

या उपक्रमाच्या माध्यमातून अवयवदान व नेत्रदानाबाबत जनजागृती करून नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. आपल्या एका निर्णयामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला जीवदान मिळू शकते, तर नेत्रदानामुळे अंध व्यक्तीला दृष्टी मिळू शकते, या सामाजिक जाणिवेतून ग्रामपंचायतीने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

या कार्यक्रमात गावातील ज्येष्ठ नागरिक मा. श्री. प्रभाकरजी रंगनाथ ढोकरे (रा. खडक सुकेणे) यांनी स्वतः पुढाकार घेत स्वेच्छेने अवयवदान व देहदान करण्याची लेखी संमती ग्रामपंचायतीकडे दिली. त्यांच्या या धाडसी व प्रेरणादायी निर्णयामुळे उपस्थितांमध्ये अवयवदानाबाबत मोठी सकारात्मक भावना निर्माण झाली.

त्यांच्या या समाजोपयोगी कार्याबद्दल ध्वजारोहणानंतर ग्रामपंचायत खडक सुकेणेच्या वतीने शाल, सन्मानपत्र व पुस्तके देऊन गौरव करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीकडून पुढेही अवयवदान व नेत्रदान नोंदणी सुरू राहणार असल्याचे जाहीर करून नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

या प्रसंगी सरपंच रंजनताई गुबाडे, उपसरपंच मधुकर फुगट, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, ग्रामपंचायत अधिकारी मनोहर गांगुर्डे, गावातील ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, महिला शासकीय अधिकारी, महिला ग्रामस्थ, शिक्षकवृंद तसेच शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा उपक्रम निश्चितच समाजात अवयवदानाबाबत जागृती निर्माण करणारा व इतरांना प्रेरणा देणारा ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow