६४ लाख शेतकऱ्यांना मिळणार रु.२५५५ कोटी विमा नुकसान भरपाई

Mar 28, 2025 - 14:17
Mar 28, 2025 - 15:40
 0
६४ लाख शेतकऱ्यांना मिळणार रु.२५५५ कोटी विमा नुकसान भरपाई

मुंबई, दि.२८ : राज्यातील तब्बल ६४ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा  निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, त्यांच्या खात्यावर थेट रु. २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे. शासनाने विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून रु. २८५२ कोटी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.

या निर्णयामुळे मागील विविध हंगामांतील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा होणार आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना देण्यात आल्या असून, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

या अंतर्गत खरीप २०२२ आणि रब्बी २०२२-२३ या हंगामांसाठी रु. २.८७ कोटी, खरीप २०२३ साठी रु. १८१ कोटी, रब्बी २०२३-२४ साठी रु. ६३.१४ कोटी आणि खरीप २०२४ साठी रु. २३०८ कोटी इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित होणार आहे. एकूण रु. २५५५ कोटी रकमेचा लाभ राज्यातील ६४ लाख लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

शासनाने विमा कंपन्यांना निधी वितरित केला असून, नुकसान भरपाईची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow