ग्रामीण रस्त्यांची कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण करा – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

Apr 7, 2025 - 10:56
 0
ग्रामीण रस्त्यांची कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण करा – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

गावांच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावीत, अशा सूचना विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिल्या.  जामखेड तालुक्यातील दौंडाचीवाडी-तरडवाडी ते जिल्हा हद्द या ३ कोटी ४६ लक्ष २० हजार रुपये किंमतीच्या आणि वंजारवाडी-तित्रंज ते जिल्हा हद्द या २ कोटी १६ लक्ष ६१ हजार रुपये किंमतीच्या रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी सभापती प्रा. शिंदे बोलत होते.

कार्यक्रमास डॉ.जयराम खोत, रवी सूर्यवंशी, नानासाहेब गोपाळगरे, केशव वनवे, ॲड. सुभाष जायभाय, सचिन घुमरे, महेश काळे, गणेश लचके, मच्छिंद्र गीते, प्रशांत कांबळे आदी उपस्थित होते.

सभापती प्रा. शिंदे म्हणाले की, दौंडाचीवाडी-तरडवाडी व वंजारवाडी-तित्रंज या गावांची अनेक दिवसांची रस्त्यांची मागणी होती. हा रस्ता पूर्ण करण्याबाबत दिलेल्या शब्दाची पूर्तता आज या निमित्ताने पूर्ण होत आहे. गतकाळात तालुक्याच्या विकास कामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या १०० कोटी रुपयांच्या विकास निधीमध्ये या गावांचाही समावेश करण्यात आला होता. सुमारे पावणे सहा कोटी रुपये खर्च करून सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचे काम दर्जेदार होईल, याकडे गावकऱ्यांनी जबाबदारीने लक्ष द्यावे.  गावाच्या स्मशानभूमीसाठी रस्ता, पेव्हर ब्लॉकची कामेही येत्या काळात करण्यात येतील. खर्डा-सोनेगाव रस्त्याचे खडीकरणाचे काम पूर्ण झाले असुन त्याठिकाणी डांबरीकरणाची कामे करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचेही ते म्हणाले.

डॉ. जयराम खोत यांनी प्रास्ताविक केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow